पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून खून
चंदगड / प्रतिनिधी
पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून चक्क तरुण पोलिस पाटील यांचा कोयता व खुरप्याने डोकीत व मानेवर सपासप वार करून ठार मारल्याची दुदैवी घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील देवचारंगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली. यामुळे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संदीप ज्ञानदेव पाटील (वय 41) रा. पोवाचीवाडी असे मृत तरुण पोलिस पाटीलांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू असून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप याला बोलावून घेतले.त्यानुसार पोलिस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवचारंगी नावाच्या शेतात संशयित रोहित पाटील,निवृत्ती राजाराम पाटील, अरूण राजाराम व योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले असता जुन्या वादात पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून कोयता व खुरप्याने हातावर,डोकीत व मानेवर सपासप वार करून ठार मारले.या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मयत याच्या पश्चात आई,वडील,पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
*तक्रारीत नाव घातल्याचा राग*
संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) या नातलगात मार्च २०२३ रोजी भांडण झाले होते. यामध्ये रोहित व भावकीतील काहीजणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये मयत पोलिस पाटील संदीप यानेच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याच्या रागातून हा खून झाल्याचे घटनास्थळी बोलले जात असल्याचे समजते.
पोलिसांसमोर आव्हान – चंदगड तालुका पोलीस पाटील संघटना व नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत सर्व आरोपींना पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा