आरोग्य

झोळीतून आणून केली प्रसुती ; नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी इथल्या धनगर वाड्यांची अवस्था

चंदगड / प्रतिनिधी
पायाभूत सुविधांअभावी किती गरोदर महिलांचे आणि प्रसूतीपूर्व बालकांचे जीव धोक्यात घालणार हा मूळ प्रश्न आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नाची जाणीव असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना हे धनगरवाडे दिसत नाहीत का? इथल्या असुविधा,गर्भवती महिलांचा त्रास यांना समजत नाहीत का? असा संतप्त सवाल तालुक्यातुन होत आहे.वर्षानुवर्ष कोल्हापूर जिल्ह्यात आमदार, खासदार म्हणून निवडून येणाऱ्या नेत्यांचा हा लाजिरवाणा पराभव आहे असं त्यांना वाटत नाही का? या प्रश्नाची जेव्हा उत्तरे मिळतील तेव्हा कदाचित कोल्हापूर जिल्हा विकासाच्या वाटेवर स्वयंपूर्ण आहे असं म्हणता येईल.
कधी हत्ती तर कधी गव्यांचा कळप रस्त्यावर बसलेला… भक्ष्य पकडण्यासाठी दबा धरलेला बिबट्या…लोकांसमोरून दिवसाढवळ्या गाई-म्हशींना ओढून नेणारा पट्टेरी वाघ अशा भयावह अवस्थेत असणाऱ्या चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द येथील धनगरवाड्यावरील एका महिलेला सोमवारी रात्री प्रस्तुतीसाठी चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाड्यावरील काहींना चक्क झोळीचा आसरा करावा लागला.बाळंतीण व बाळ सुखरूप आहे मात्र चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या शासनाला ग्रामीण भागातील ही भयावह परिस्थिती दिसत नाही का?
केवळ दैव बलवत्तर म्हणून नवजात अर्भकाचा सुखरूप जन्म झाला.पण अजूनही जर प्रसूतीसाठी डोलीतून पायी प्रवास करत आणावे लागत असेल तर कसला विकास आणि कुठल्या प्रगतीच्या गप्पा… कोल्हापूर जिल्ह्यातील आजवरच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी इथल्या धनगर वाड्याची अवस्था आहे.कानूर खुर्द पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाड्यावर पल्लवी भागोजी झोरे (वय २०) हिला सोमवारी रात्री बाराच्या सुमारास प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यानंतर यशवंत क्रांतीचे संघटनेचे कोडीबा येडगे, चिचू येडगे, कविता येडगे, जयश्री झोरे, पती भागोजी झोरे, कोडिबा झोरे व धोंडूबाई झोरे यांनी वेळ न दवडता चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधला. पण धनगरवाड्यापासून मुख्य रस्त्यापर्यंत रस्ताच नसल्यामुळे धनगरवाड्यापर्यंत रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. तुम्ही पल्लवीला घेऊन पुढे रस्त्यावर या असे रुग्णवाहिकेच्या चालकांने सांगितल्यावर सर्वांनी तिला घोंगड्याच्या झोळीत घालून बॅटरीच्या उजेडात चार किलोमीटर जंगलातून पायपीट करून मुख्य रस्ता गाठला. त्यानंतर पल्लवीला रुग्णवाहिकेत घालून चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिश्रम घेत तिची सुटका केली. त्यामुळे बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत. केवळ पल्लवीचे नशीब बलवत्तर म्हणून ती बचावली.जिल्ह्यातील नेतेमंडळी विकासाच्या गप्पा मारतात तर दुसरीकडे दुर्गम भागातील काही वाड्या-वस्त्यांवर दळणवळणाची साधनं नाहीत कि आरोग्य यंत्रणा नाही. रस्ते, पाणी, वीज, सार्वजनिक स्वच्छता यापासून दूर असलेल्या धनगर वाड्यात वर्षानुवर्ष अनेक कुटुंब रोज जगण्याची लढाई लढत असतात. स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही पल्लवीला रुग्णालयात पोहचविण्यासाठी लोकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडावी आम्हाला मेट्रो नको…आम्हाला समृध्दी महामार्ग नको… हवेतून जाणारी बसही नको फक्त कसलाही असो निदान वाहन धनगरवाड्या्वर पोहचेल असा रस्ता करा, जेणेकरून आम्हाला आमच्या बऱ्यावाईट प्रसंगातून मार्ग काढता येईल. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांनी आमच्या या व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पोहचवाव्यात, अशी मागणी यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected