आयुर्वेद जगाला निरामय आयुष्याचा राजमार्ग दाखवेल-आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन
जयसिंगपूर / प्रतिनिधी
आयुर्वेद आणि निसर्गोपचार यामुळे कोरोनातून पूर्ण बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय होते. त्यामुळे सध्याच्या युगात भारतीय निसर्गोपचार, आयुर्वेद पद्धती जगाला निरामय आयुष्याचा राजमार्ग दाखवेल, असा विश्वास माजी आरोग्य राज्यमंत्री, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला.बीएसएल इंडिया संस्थेच्या प्रियदर्शिनी कॉलनीतील श्री समर्थ निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, की कोविडच्या काळात जगातील अनेक देशांतील हजारो लोक मृत्यूमुखी पडत होते. भारतात मात्र बऱ्याच ठिकाणी कोरोना रुग्णांवर निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होत होते. त्यामुळे कोरोनामधून अनेक रुग्ण पूर्ण बरे झाले. म्हणूनच नागरिकांनी आयुर्वेदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी या केंद्राला भेट देऊन रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत जाणून घेतले.
आमदार यड्रावकर यांच्या हस्ते श्री समर्थ निसर्गोपचार केंद्राच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. डॉ. सलीम आळतेकर यांनी आयुर्वेदाचे महत्त्व विशद केले. बीएसएल इंडियाचे संस्थापक डॉ. विजय जगदाळे यांनी संस्थेची स्थापना, उद्दिष्टे, उत्पादने याबाबत सांगितले. स्वागत केंद्राचे संचालक सुनील इनामदार यांनी केले. प्रास्ताविक निसर्गोपचार तज्ञ डॉ. दिलीप तुरुंबे यांनी केले. सूत्रसंचालन मनोज पोटे यांनी केले. आभार राजू पांढरे यांनी मानले. यावेळी सुदर्शन चौगुले, जयकुमार आवटी, प्रभाकर तावरे, जयसिंग कुंभार, श्रीकांत कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, शीतल पाटील, स्वप्नील मादनाईक, बसवराज कब्बुरी आदि उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा