क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केल्यास होणार कारवाई
चंदगड / प्रतिनिधी
अथर्व – दौलत साखर कारखाना प्रशासनाने अवजड ऊस वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी,अपघाताचा धोका पाहता ऊस वाहतूकदारांना सक्त सूचना केल्या असून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊस वाहतूकदारांनी खबरदारी घेवून सुरक्षित वाहतूक करण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
ऊसाचा हंगाम जोरात सुरू असताना अवजड ऊस वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही चंदगड तालुक्यातील मुख्य राज्यमार्ग असलेला बेळगांव-वेंगुर्ला मार्गावरून होणारी अवजड वाहतूक पाहता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.एका ओव्हरलोड ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांसह कारखाना प्रशासन सतर्क झाले आहे.
अथर्व-दौलत साखर कारखान्याच्यावतीने सर्वच ऊस वाहतूकदार यंत्रणेला सक्त ताकीद दिली असून ओव्हरलोड ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कुणीही क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून आणू नये. अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका होवू नये यासाठी सर्वच वाहतूकदारांनी सुरक्षित आणि मर्यादित क्षमतेतच ऊस वाहतूक करावी असे आवाहन अथर्व-दौलतचे शेती अधिकारी युवराज पाटील यांनी केली आहे. तसेच या हंगामात कारखान्याकडे ऊस वाहतूकिची यंत्रणा अपुरी पडल्यामुळे कर्नाटकातून वाहतूकदारांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांची ऊस भरण्याची पद्धत ही वेगळी असून ट्रॅक्टर ट्रॉली देखील वेगळ्या आहेत. त्यामुळे देखील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र,त्यांना योग्य त्या सूचना केल्या असून मर्यादित क्षमतेत सुरक्षित वाहतूक करण्याच्या सूचना केल्या आल्याचे पाटील यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा