जयसिंगपुरात भीषण आग : पतसंस्थेसह अनेक व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर ते शिरोळ या मुख्य मार्गालगत अकराव्या गल्लीतील डॉक्टर धनवडे यांच्या मिळकतीला काल सोमवारी रात्री भीषण आग लागली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे त्या परिसरातील नागरिकांनी सांगितले. या ठिकाणी असलेल्या बाबुराव धनवडे पतसंस्थेसह पाच ते सात व्यापाऱ्यांची दुकाने सुद्धा या आगीत जळून खाक झाली.आज मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुद्धा आग विझवण्याचे काम सुरूच होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,रात्री दोन सव्वादोन वाजण्याच्या सुमारास या परिसरातील नागरिकांना कसलातरी आवाज आल्यानंतर लोकांचा गदारोळातील आवाज ऐकू आला. अकराव्या गल्लीतील शेकडो नागरिकांनी ही आग लागल्याचे प्रत्यक्ष पाहिले. मात्र याबाबत सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अधिकृत रित्या नोंद नसल्याचे सांगण्यात आले. रात्री घटना घडल्यापासून आज सकाळपर्यंत जयसिंगपूर पोलिस कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते. आज सकाळपासून तर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कमालीचे प्रयत्न सुरू होते.
अकराव्या गल्लीत असलेल्या हनुमान मंदिरा लगत आणि दत्त मंदिरासमोर धनवडे यांची मिळकत आहे. रात्री उशिरा आग लागल्यानंतर काच फुटण्या सदृश्य आवाजामुळे दत्त मंदिर परिसरात रहिवासी असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते भगवंत जांभळे यांनी घराबाहेर येऊन पहिले असता समोरच्या धनवडे यांच्या मिळकतीला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धनवडे यांना मोबाईल वरून संपर्क न झाल्यामुळे त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष माहिती जांभळे यांनी दिल्याचे जांभळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दत्त साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, कुरुंदवाड नगरपालिका या तिन्ही संस्थांचे अग्निशमन दल काल रात्री सूचना मिळाल्यापासून आज मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करीत होते. रात्री आगीचे फक्त लोटच्या लोट आकाशात उंचीपर्यंत पहिल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. या मिळकतीत असणारे कपड्यांचे दुकान, शालेय साहित्याचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान, धनवडे पतसंस्था, एका टेलर्सचे दुकान अशी अनेक दुकाने व त्यातील साहित्य अंदाजे कित्येक करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता घटनास्थळावर सुरू होती.
आगीचे प्रत्यक्ष चित्रण घटनास्थळावरील उपस्थित असलेल्या नागरिकांकडून प्राप्त झाले आहे. तर आज दिवसाच्या उजेडातील सर्व चित्र हे प्रत्यक्ष घटनास्थळावरून प्राप्त केले आहे.दरम्यान आज सकाळी शहरातील नागरिक जागे होताच प्रत्येक जण दूध खरेदीसाठी जवळच असलेल्या किराणा दुकानात गेल्या गेल्या रात्री लागलेल्या आगीची माहिती नागरिकांना मिळाली. त्यानंतर मात्र घटनास्थळी आज सकाळपासून प्रचंड बघ्याची गर्दी झाली. तर जयसिंगपूर शिरोळ हा मुख्य रस्ता असल्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडणारे लोक तसेच अनेक वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. जयसिंगपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक आणि मात्र घटनास्थळापासून पूर्व पश्चिम दिशेला वाहतूक वळवल्यानंतर बऱ्याच वेळाने वाहतूक सुरळीत झाल्याचे समजते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा