धामोडमध्ये अखंड हरीनाम सप्ताह सोहळा सुरू
देई मज प्रेम सर्वकाळ
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
रखुमाई चा पती सोयरिया ||
विठू माऊली हाचि वर देई
संचारुनी येई हृदयी माझ्या ||
तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
राधानगरी – अरविंद पाटील
तालुक्यातील धामोड गावात श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सोहळा सुरू आहे. ३१ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताह काळात दैनंदिन सकाळची काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन, आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे तसेच विविध जिल्ह्यातून आलेल्या महाराजांचे भजन असा दिनक्रम आहे. सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण आहे. सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. ७) सारे गावकरी एकत्र येत लोकोत्सव साजरा करणार आहेत. या वेळी वारकरी संप्रदायाची वेशभूषा करणार असून महिला, भाविक फुगड्या खेळात दंग होऊन आनंदोत्सव साजरा करणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली. सकाळी काढण्यात आलेल्या दिंडीत वारकरी वेषभूषातून पुरुष, महिला, लहानथोर मंडळी टाळमृदंगाच्या गजरात, अभंग व भजने गात होती. जय जय राम कृष्ण हरी…’च्या जयघोषाने सारे वातावरण दणाणून गेले होते. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांचे पाय थिरकत होते. सारा गावच विठ्ठलमय झाला होता. विठ्ठल भक्तीत गाव न्हाऊन निघाले होते. गावात पंढरीच अवतरली होती, असे चित्र होते.
धामोड येथे तेली परिवाराकडुन अखंडीत जोपासली जातेय हरिनाम सप्ताहाची सुरुवात
गळ्यात टाळ, डोकीवर तुळस, खांद्यावर भगवी पताका अन् मुखात हरिनामाचा गजर करत हरिनाम सप्ताहाची सुरुवात भल्या पहाटे ग्रामदैवत भानोबा मंदीरापासुन दिंडीने सुरु झाली. टाळ मृदंगाच्या गजरात धामोड येथिल माधवी भिकाजीराव तेली यांचे घरी या दिंडीचे औक्षण करण्यात आले. गेली ३६ वर्ष कैलासवासी भिकाजीराव तेली व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी माधवी, मुलगा दिपक व संग्राम, सुना माया व शुभदा या परिवाराने ही परंपरा अखंडीत जोपासली आहे. त्यांच्या दारी आज सकाळी अनेक महाराज वारकरी, टाळकरी महिला पुरुष दिंडीतुन सहभागी झाले होते. तेली परिवारांच्यात विठ्ठल भक्तांची मांदियाळी जमली होती.घरी भजन करण्यात आले, सर्वांना उत्तम चहा नाश्ता देवुन दिंडी विठ्ठल मंदीराकडे मार्गस्थ झाली.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा