विकासकामांबाबत आमदार यड्रावकर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे – ना.शंभूराज देसाई यांचे गौरवोद्गार
जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
यांच्यासारखे कर्तृत्वसंपन्न नेतृत्व लाभले आहे. त्यांनी तब्बल
१४०० कोटी रूपयांचा निधी शासनाकडून आणून विकास
कामांचा डोंगर उभारला.आमदारांनी कशा पध्दतीने काम
करायचे हे आमदार यड्रावकर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे असे गौरवोद्गार ना.शंभूराज देसाई यांनी काढले.
शिरोळ तालुक्यातील अद्याप प्रलंबित असणाऱ्या कामांसाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
यांनी दिली.येथील सहकाररत्न स्व.शामराव आण्णा यड्रावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शरद सहकारी साखर कारखाना नरंदे,शरद कृषी महाविद्यालय जैनापूर यांच्यावतीने आयोजीत राज्यस्तरीय सातव्या शरद कृषी व पशु पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार शंभूराज देसाई यांनी फित कापून केले.याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद साखर कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर होते.
नामदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले, शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते.याचा लाभ निश्चित शेतकऱ्यांना होईल. यंदा राज्यात पर्जन्यमान घटले आहे. यामुळे कोयना धरणात केवळ ७० टक्के पाणी साठा झाला आहे. यामुळे
भविष्यात शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोरपणे वापर करून शेती करावी. कमी पाण्यावर अधिक उत्पादन कसे घेता येईल यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे.
स्व. दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार, कै. बाळासाहेब माने, स्व.
शामराव आण्णा यड्रावकर या दिग्गज मंडळींनी शिरोळ
तालुक्यास सहकारातून समृध्दीकडे नेण्याचे स्वप्न पाहिले. हा परिसर सहकारातून सुजलाम सुफलाम केला. सहकाराच्या माध्यमातून जे काम महाराष्ट्रात झाले ते देशात पहायला मिळत नाही. संचालक मंडळ व अधिकारी वर्ग ही सहकाराची दोन चाके आहेत.हीदोन्ही चाके समन्वयातून चालली तरच सहकार टिकेल. शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान मिळावे या हेतुने दहा वर्षापुर्वी
कृषी प्रदर्शनाची संकल्पना मांडली.यानंतर कोरोनाप्रादुर्भावाचा कालखंड वगळता सातत्याने प्रतिवर्षी शरद कृषी प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात येते असे स्पष्ट करून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, कमी पर्जन्यमान असूनही शिरोळ
तालुक्यातील शेतकरी दरडोई उत्पन्नात पुढे आहे. कृष्णा
पंचगंगा, वारणा, दूधगंगा यानद्यांमुळे येथे बागायत क्षेत्र अधिक आहे. काबाडकष्ट करून येथील शेतकरी एकरी १४० टनापर्यंत उस उत्पादन घेत आहे.कमी क्षेत्रात अधिक उत्पादन
घेण्यात येथील शेतकरी अग्रेसर आहे. येथील भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यात जात आहे.
तालुक्यात क्षारपड जमिनींचे क्षेत्र वाढले आहे. तब्बल २५ हजार एकर इतकी जमीन क्षारपड असून या जमिनी पुन्हा पिकाऊ बनविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योजना राबविण्यात आली आहे. या जमिनींचे सर्वेक्षण झाले आहे. पुन्हा ही जमीन बागायत होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील
आहोत.स्व.शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी सहकाराचा पाया रचला.शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक बनला पाहिजे यासाठी पार्वती औद्योगिक वसाहतीची स्थापना केली.दूरदृष्टीने उभारलेल्या या वसाहतीत आज ३५० उद्योजकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये सुमारे २० हजार कामगार काम करीत आहेत. संघर्षातून स्थापना झालेला शरद सहकारी
साखर कारखान्याने अल्पावधीत प्रगती साधली आहे.
आमदार यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यात उदगाव येथे ३७५ बेडचे अत्याधुनिक मनोरूग्णालय उभारण्यात येत आहे. याचबरोबर १०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच १०० बेडच्या आयुष हॉस्पिटलला मान्यता मिळाली आहे. अकिवाट येथे औद्यागिक वसाहत उभारण्यात येत असून यामुळे तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे तालुक्यातील तीनही नगरपालिकांना विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला आहे. तालुका क्रीडा संकुलासाठी ७५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. जमिन अधिग्रहण करून हे काम मार्गी लावण्यात येईल. प्रत्येक गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत
पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तालुक्यातील पाणंद रस्त्यांसाठी भरघोस निधी मिळाला आहे. एकही रस्ता कच्चा राहणार नाही.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाषसिंग रजपूत यांनी केले. यड्रावकर शिक्षण व उद्योग समुहाच्यावतीने नामदार शंभूराज
देसाई यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला. नाट्यशुभांगी या नाट्यसंस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माहिती पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. शेतीत उसपिकाबरोबरच उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा, विविध शासकिय पदावर नियुक्ती झालेल्यां गुणवंतांचा सत्कार नामदार देसाई यांच्याहस्ते करण्यात आला. आभार संजय नांदणे यांनी मानले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, पं.स.चे माजी सभापती प्रकाश पाटील टाकवडेकर, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्षा सौ. स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर, पोलीस
उपअधिक्षक रोहिणी सोळंके, शरद साखरचे उपाध्यक्ष थबा कांबळे, संचालक आदित्य पाटील यड्रावकर, यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश मलमे,तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे पाटील, सुरेश शहापुरे, अजित उपाध्ये, रिसोर्सेस इव्हेंटचे राजेश शहा तसेच शरद साखर कारखान्याचे संचालक, यड्रावकर उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा