नृसिंहवाडीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

नृसिंहवाडीत ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Jul 13, 2026 - 21:47
 0  99
नृसिंहवाडीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

नृसिंहवाडी : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील रस्ते, मूलभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला प्राधान्य देत शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी कन्यागत महापर्व काळाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नृसिंहवाडीसह संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

नृसिंहवाडी येथे 'इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबूतीकरण या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या रस्ते विकास कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे श्रद्धेचे केंद्र आहे. वर्षभर तसेच विविध उत्सवकाळात हजारो भाविक येथे येत असल्याने दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विविध योजनांमधून सातत्याने निधी उपलब्ध करून विकासकामे हाती घेण्यात येत आहेत.

आगामी कन्यागत महापर्व काळाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते, परिसर सुशोभीकरण आणि इतर आवश्यक विकासकामांनाही गती दिली जाणार आहे. नृसिंहवाडीचा विकास हा केवळ स्थानिकांसाठी नव्हे, तर संपूर्ण राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा असून या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य फजलेअली पाटील, दादेपाशा पटेल, डॉ. किरण अनुजे, मुकुंद पुजारी, मुरलीधर गवळी, गुरुदास खोचरे, संजय शिरटीकर, चेतन गवळी, गुरुप्रसाद रिसबूड, अविनाश शिंदे, कृष्णा गवंडी, शिवाजी भोसले, अमर नलावडे, संजय गवंडी, प्रवीण अनुजे, विकास कदम आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0