जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केला विश्वास

Jul 5, 2026 - 18:15
 0  6
जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश
जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश
जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश

शिरोळ : प्रतिनिधी :

मर्यादित रूपात असणाऱ्या जमिनीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अशावेळी जमिनीचे व्यवस्थापन करण्याचे रोल मॉडेल श्री दत्त पॅटर्नने तयार केलेले आहे. देशात सुरू असलेले 'खेत बचाव अभियान' श्री दत्त कारखान्याने अतिशय सुंदररित्या यशस्वी केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान कर्नाल हरियाणा आणि व्ही. एस. आय. च्या वतीने संयुक्तिकरित्या जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळेल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केला.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा, क्षारपड जमीन सुधारणा यशोगाथा व गळीत हंगाम 2025 - 26 मधील ऊस पिक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. विलास खर्चे बोलत होते. 

राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान कर्नाल हरियाणाचे सिंचन व जलनिस्सारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. बुंदेला यांनी 'कृत्रिम निचरा प्रणाली तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन' या विषयावर बोलताना जमीन खराब होण्याची कारणे सांगून आवश्यकतेनुसार पाणी वापरणे, क्षारपड समस्येवर जागरूकता निर्माण करणे, शेतकरी बहुउद्देशीय संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणे आणि संबंधितांना प्रशिक्षण देणे आदी विषयावर मार्गदर्शन केले.

व्ही. एस. आय. पुण्याचे पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभागप्रमुख डॉ. ए. डी. कडलग यांनी 'जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व व उपाययोजना' या विषयावर बोलताना जमिनीचे आरोग्य, भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, पोषक अन्नद्रव्ये, पाण्याचे व खताचे योग्य नियोजन, माती परीक्षण, कीटकनाशकाचा योग्य वापर, ऊस लागणी व तोडणी कार्यक्रम आदीविषयी मार्गदर्शन केले.

'क्षारपड जमीन सुधारणा दत्त पॅटर्नची कार्यपद्धती' या विषयावर बोलताना कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज सांगलीचे प्रभारी अधिकारी डॉ. श्रीमंत राठोड यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान व श्री दत्त कारखाना कार्यक्षेत्रातील अनुभवाचा साठा यातून जमिनी क्षारपड मुक्त होत असल्याचे सांगितले. तसेच सोसायटी स्थापन करणे, अर्थसाहाय्य उपलब्ध करणे, बंदिस्त सच्छिद्र निचरा प्रणाली चा वापर या विषयी मार्गदर्शन केले. शिरोळ दत्त मॉडेल अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक मंडळ तसेच कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. अनिल राजगुरू, डॉ. सचिन महाजन, डॉ. संग्राम काळे, महाधन ॲग्रोटेकचे विभागीय विपणन व्यवस्थापक योगेश म्हसे, एस. व्ही. ॲग्रो सोल्युशन पुणेचे डायरेक्टर डॉ. शांतीकुमार पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी पी. एस. देसाई, हलसिद्धनाथ साखर कारखाना संचालक रामगोंडा पाटील (जनवाड), कृषीपंडित सुरेश देसाई (बेडकिहाळ) यांच्यासह शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील कारखाना सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रारंभी स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक तर श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सतपाल खोंद्रे, जंबूकुमार चौगुले, रावसो विठ्ठाण्णा, सौ. अश्विनी शेरीकर या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रवीण माळी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी मानले.

हंगाम अडसाली ऊस पिक स्पर्धेत आण्णासो हंबीरराव पाटील (माले) - प्रथम, जंबूकुमार बापूसो चौगुले (साजणी) - द्वितीय, सुभाष रामगोंडा पाटील (शिरगुपी) यांचा तृतीय क्रमांक आला. तर भाऊसो ईश्वरा पसारे (कारदगा), लक्ष्मण ईश्वरा पसारे (कारदगा),महादेव भाऊ कुलकर्णी (कुन्नूर) या तिघांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. हंगाम पूर्व हंगामी स्पीक स्पर्धेत दादासो जिन्नाप्पा गतारे (शिरटी) तर हंगाम खोडवा ऊस पीक स्पर्धेत श्रीपाद तातोबा शेरीकर (माणगाव) यांना बक्षीस मिळाले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0