औषध खरेदी खोर आणि भेसळखोरांवर गुन्हे दाखल करा
आरोग्य हक्क समितीची मागणी
मिरज : प्रतिनिधी
हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीविरोधात आणि भेसळ करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आरोग्य हक्क समितीने केली आहे. एफडीएकडे (FDA) ही धडक मागणी करण्यात आली आहे.
सांगली येथील खाजगी रुग्णालयांकडून होणारी औषध खरेदीची सक्ती, हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर्सचे बेकायदेशीर हितसंबंध, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि अमली पदार्थांची विक्री या गंभीर गैरप्रकारांविरोधात 'जन आरोग्य अभियान - आरोग्य हक्क समिती, सांगली' च्या वतीने अन्न व औषध प्रशासन (FDA) सांगलीचे सहाय्यक आयुक्त यांना नुकतेच निवेदन दिले असून सांगली जिल्ह्यातील जागरूक नागरिकांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने यावर तातडीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
या निवेदनाद्वारे समितीने खालील प्रमुख मुद्दे आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
औषध खरेदीच्या सक्तीला पायबंद व टोल-फ्री क्रमांक: अनेक खाजगी रुग्णालये रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून औषधे आणू देत नाहीत. स्वतःच्याच हॉस्पिटलमधून औषधे घेण्याची सक्ती करतात. हा थेट ग्राहक हक्कांचा भंग असून अशी सक्ती रोखण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्वे जारी करावीत आणि तक्रारीसाठी तात्काळ टोल-फ्री क्रमांक सुरू करावा. या मागणीसह हॉस्पिटल परिसरातील मेडिकलचे परवाने रद्द करावेत असे साकडे घालण्यात आले आहे.
खाजगी हॉस्पिटलच्या आवारातील मेडिकल स्टोअर्सचे हॉस्पिटलशी थेट आर्थिक हितसंबंध असतात, त्यामुळे औषधांची मक्तेदारी निर्माण होत आहे आणि रुग्णांची लूट होत आहे. अशा व्यावसायिक हितसंबंधांची चौकशी करावी आणि त्यांचे मेडिकल परवाने (Licenses) रद्द करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान दोषी रुग्णालयांवर कडक कारवाई की जे रुग्णालय प्रशासनाचे नियम डावलून रुग्णांना ठराविक ठिकाणाहूनच औषधे व वैद्यकीय साहित्य घेण्यास भाग पाडतात, त्यांच्यावर केवळ जुजबी दंड न करता कडक कायदेशीर कारवाई व्हावी. अशी ही मागणी होत आहे. भेसळयुक्त दुग्धजन्य व अमली पदार्थ विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या ही मागणी सुद्धा दुर्लक्षित झालेली नाही. दुग्धजन्य पदार्थांमधील घातक भेसळ आणि अमली पदार्थांच्या अवैध विक्रीमुळे नागरिकांच्या व बालकांच्या जिवाला थेट धोका निर्माण झाला असून त्यामुळे अशा समाजकंटकांवर अन्न सुरक्षा कायद्यासोबतच थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी होत आहे.
दरम्यान आणि औषध प्रशासन ज्यांच्या ताब्यात आहे ते तुकाराम मुंढे यांच्या लोकहितैषी कारवायांचे कौतुक सुद्धा होत असून आरोग्य व्यवस्थेतील गैरप्रकारांना प्रतिबंध लावून सर्वसामान्य रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या व प्रामाणिक कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचे समितीने विशेष अभिनंदन व कौतुक करून गौरव केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे रक्षण करावे आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात आहे.
यावेळी आरोग्य समिती अध्यक्ष शाहीन शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रमोद माळी, प्रदीप पाटील, रमजान खलिफा, नजीर हेरवाडे, संदीप पवार, इलियास शेख, रफीक पटेल उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0