औद्योगिक वसाहतीला विरोध ही हट्टवादी भूमिका : आमदार यड्रावकर

आंदोलक आणि आमदार यड्रावकर यांच्यातील चर्चा फिस्कटली

Aug 11, 2026 - 12:24
 0  45
औद्योगिक वसाहतीला विरोध ही हट्टवादी भूमिका : आमदार यड्रावकर

जयसिंगपूर : प्रतिनिधी

सैनिक टाकळी येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या मुद्द्यावरून रविवारी विरोध करण्यासाठी आलेल्या काही आंदोलकांची आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या समर्थकांशी समोरासमोर चर्चा झाली. मात्र, दोन्ही बाजूंच्या भूमिकांमध्ये तडजोड न झाल्याने चर्चा निष्फळ ठरल्याचे चित्र होते.

सैनिक टाकळी परिसरात औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्धार आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी भूमिका यड्रावकर समर्थकांकडून मांडली जात आहे. परिसरातील नागरिक व माजी सैनिकांनीही औद्योगिक वसाहतीला पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान औद्योगिक वसाहत रद्द करण्याच्या मागणीसाठी काही आंदोलकांनी रविवारी जयसिंगपूर येथील आमदार यड्रावकर यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलक जयसिंगपूरकडे येत असल्याची माहिती मिळताच यड्रावकर समर्थक मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती चिघळू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. आंदोलकांच्या निवडक प्रतिनिधींशी चर्चा करून दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सिद्धेश्वर मंदिराजवळ आमदार यड्रावकर आणि आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.

चर्चेदरम्यान औद्योगिक वसाहतीच्या समर्थनार्थ आणि विरोधातील भूमिका ठामपणे मांडण्यात आल्या. आंदोलकांनीऔद्योगिक वसाहतीला विरोध दर्शवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली, तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर परिसराच्या औद्योगिक विकासासाठी औद्योगिक वसाहत आवश्यक असल्याची भूमिका मांडली. दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही.

 दरम्यान याबाबत बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, सैनिक टाकळी येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टाकळी व परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आपण २०१४ पासून औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्नशील असून,गावसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 औद्योगिक वसाहतीला काही नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाबाबत बोलताना यड्रावकर म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र,औद्योगिक वसाहत करायचीच नाही अशी हटवादी भूमिका योग्य नाही. या विरोधामुळे परिसरातील जनतेचे मोठे नुकसान होऊ शकते. रोजगाराची संधी आणि विकासाची प्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे.’

प्रस्तावित औद्योगिक वसाहतीमध्ये महिलांसाठी क्लस्टर गारमेंट उद्योग उभारणार आहे ‘यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही. स्थानिक युवक तसेच माजी सैनिकांना या औद्योगिक वसाहतीमध्ये प्राधान्य देण्याची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. टाकळी परिसराचा केवळ औद्योगिक नव्हे तर सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले. सैनिकी स्कूल, युवकांसाठी क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच सैनिकी कॅन्टीन उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन माजी सैनिक, युवक व ग्रामस्थांना दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान औद्योगिक वसाहतीलाविरोध करणाऱ्या आंदोलकांशी झालेल्या चर्चेबाबत ते म्हणाले, ‘आजच्या बैठकीत आंदोलकांनी आडमुठी भूमिका घेतल्याने चर्चा फिस्कटली. प्रश्न चर्चेतून सोडविण्याऐवजी ‘घराच्या काचा फोडतो, घर जाळतो’ अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही. विकासाच्या मुद्द्यावर शांततेने चर्चा झाली पाहिजे. शिरोळ तालुक्याच्या विकासासाठीच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले आहे. जनतेने दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी तन,मन,धनाने आणि कोणत्याही परिस्थितीत शिरोळ तालुक्याचा विकास करत राहणार आहे. टाकळी परिसरातील युवकांना रोजगार, माजी सैनिकांना संधी आणि परिसराचा सर्वांगीण विकास हेच माझे उद्दिष्ट आहे असे आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0