जयसिंगपूरात तिसरे नांगरट साहित्य संमेलन 

Jun 2, 2026 - 09:56
 0  11
जयसिंगपूरात तिसरे नांगरट साहित्य संमेलन 
जयसिंगपूरात तिसरे नांगरट साहित्य संमेलन 
जयसिंगपूरात तिसरे नांगरट साहित्य संमेलन 

जयसिंगपूर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेजच्यावतीने  तिसरे 'नांगरट' साहित्य संमेलन रविवारी 7 जुन रोजी डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर या ठिकाणी होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत पी. साईनाथ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मोहन पाटील, शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांना  पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

    श्री शेट्टी म्हणाले, ग्रामीण समाज जीवन, शेती, शेतकरी प्रश्न, साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांना केंद्रस्थानी ठेवून नांगरट साहित्य संमेलनाची परंपरा पुढे नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षाला साहित्यिक अभिव्यक्तीची जोड मिळावी, ग्रामीण भागातील विचारवंत, लेखक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

    रविवारी सकाळी खिलार बैल जोडी आणि नांगराच्या फाळाचे पूजन करण्यात येणार आहे. उदघाटन सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे भूषविणार आहेत. यावेळी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

    दुपारच्या सत्रात ‘शेतकऱ्यांचा आसूडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे असून प्रवीण बांदेकर, डॉ. महेंद्र कदम आणि प्रसाद कुलकर्णी सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘ऱ्हास होत चाललेली कृषी संस्कृती आणि कृषी सर्जनशीलता’ या विषयावर दुसरा परिसंवाद होणार असून विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली नामदेव माळी आणि प्रा. संदीप जगताप सहभागी होणार आहेत. 

    सायंकाळी निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून स्वाती शिंदे-पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी संघर्ष, सामाजिक वास्तव आणि समकालीन प्रश्नांवर आधारित कविता रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. साहित्य आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी कवी संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. 

    यावेळी प्रा. गोमटेश्वर पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. शांताराम कांबळे, स्वाभिमानी पक्षाचे जयसिंगपूर शहराध्यक्ष शंकर नाळे, प्रीतम पाटील, पार्श्वनाथ मोटके पाटील, विरुपाक्ष शांत, सतीश कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0