जयसिंगपूर बार असोसिएशनचा ऊस दर वाढ आंदोलनाला जाहीर पाठिंबा
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांना ऊस दर वाढ मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला जयसिंगपूर ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. असोसिएशनच्यावतीने तशा आशयाचे अधिकृत पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयसिंगपूर शहराध्यक्ष शंकर नाळे यांच्याकडे देण्यात आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि उसाला योग्य दर मिळावा यासाठी कोगनोळी टोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाची दखल घेत जयसिंगपूर बार असोसिएशनने शेतकऱ्यांच्या या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वेळोवेळी आणि सातत्याने संघर्ष करत आली आहे. त्यांच्या या ऊस दर वाढीची मागणी अत्यंत रास्त असून, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे वकिलांची ही संघटना या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असे बार असोसिएशनने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
या जाहीर पाठिंब्याबाबतचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रशीद हेतवडे, उपाध्यक्ष ॲड. सुशील कुमार जगदाळे, सेक्रेटरी ॲड. संतोष खामकर आणि खजिनदार ॲड. शितल कांबळे यांनी दिले आहे. बार असोसिएशनच्या या पाठिंब्यामुळे शेतकरी आंदोलनाला आता कायदेशीर क्षेत्रातील मंडळींचेही मोठे बळ मिळाले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0