गोकुळ मध्ये हवालाद्वारे प्रशासकांचा ढपला?
टेंडर मध्ये गोलमाल : उमेदवार प्रचारात व्यस्त : प्रशासकांचं चाललंय मस्त
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकराजाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रशासक मंडळींचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने टेंडर व पुरवठा प्रक्रियेतील काही व्यवहारांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. प्रशासक मंडळींनी जाता जाता हात साफ करून घेण्याची पूर्ण तरतूद केल्याची चर्चा गोकुळ कार्यालयात आहे.
गेल्या काही दिवसापासून गोकुळ मध्ये प्रशासक मंडळ कार्यरत आहे. कार्यालयीन कामकाजाकरता काढलेले टेंडर, वेगवेगळ्या पुरवठादारांशी प्रशासक मंडळींनी संधान साधल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय कालावधीतील टेंडरधारक व पुरवठादारांशी संबंधित व्यवहारांमध्ये दबाव, तडजोडी आणि आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप होत असल्याची चर्चा गोकुळच्या वर्तुळात सुरू आहे. काही पुरवठादारांवर कारवाई अथवा काळ्या यादीत टाकण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचेही आरोप केले जात आहेत.
विशेष म्हणजे, या कथित व्यवहारांमध्ये गोकुळमधील एका संबंधित अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुरवठादारांशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, कथित आर्थिक व्यवहारांबाबत ‘हवाला’सदृश पद्धतीने पैशांची देवाणघेवाण होत असल्याचीही चर्चा सुरू असून, या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची संबंधित सक्षम यंत्रणांनी तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
गोकुळची निवडणूक जवळ आली असून लवकरच नवीन संचालक मंडळ कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच शिल्लक कालावधीत घाईघाईने प्रशासकांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी टेंडर, खरेदी, पुरवठा आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दूध उत्पादक व सहकार क्षेत्रातून होत आहे. सदर पूर्ण विषयाची सकुल माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार होण्याची शक्यता आहे.
काही सामाजिक संघटनेने यापूर्वीच गोकुळ विरोधात आवाज उठवला होता. त्यातच हे प्रकरण आल्याने जिल्ह्यातील नेत्यांकडे न जाता थेट मंत्री व मुख्यमंत्री लेव्हलला तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात नेमके सत्य काय, आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि कोणाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गोकुळ प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.“गोकुळमध्ये ‘तोडपाणी’ची चर्चा; प्रशासकांचा कार्यकाळ संपण्याआधी व्यवहारांची चौकशी व्हावी अशी चर्चा रंगली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0