माझे प्रेरणास्थान आयुष्याच्या प्रवासातील मार्गदर्शक आदरणीय विलासआण्णा!
आज अत्यंत जड अंतःकरणाने, भरलेल्या डोळ्यांनी आणि असंख्य आठवणी मनात घेऊन हे शब्द लिहित आहे.माझ्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे,वेळोवेळी योग्य दिशा दाखवणारे आणि प्रत्येक कठीण प्रसंगी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे आदरणीय विलास आण्णा आज आपल्यातून वृद्धापकाळाने निघून गेले ही बातमी माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे.
विलासअण्णा आणि माझा परिचय त्यांचा पुतण्या संजय कोतेकर आणि मी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असल्यापासूनचा. ईश्वरा कांबळेचा मुलगा म्हणून ते माझ्याकडे नेहमीच विशेष आपुलकीने पाहत असत.हे नाते केवळ परिचयाचे नव्हते. त्यांच्या परिवाराशी खूप चांगले आमचे नाते आहे. कोकणात असताना माझ्यावर एक मोठा वाईट प्रसंग आला होता. त्यावेळी मला व माझ्या कुटुंबाला काहीही सुचत नव्हतं.मी माझं आयुष्य संपवतो की काय असं सगळ्यांना वाटत होतं.वडीलांच्या साथीला आणि आशीर्वादाला पोरका झालो होतो.यावेळी दिवंगत दिलीप आण्णा,डॉ.शिवाजी आण्णा सुभाष निरगुंडे,के.डी.आण्णा आणि विलास आण्णा यांनी मला या संकटातून बाहेर काढले. समाजातील लोकांनी तेव्हा पाठ फिरवली तेव्हा सुभाष निरगुंडे दम्याच्या आजाराने त्रस्त होते.श्वास घेता येत नव्हता.त्याकठीण परिस्थितीत सुद्धा मला मदत करण्याच्या दृष्टीने स्वतःच्या जमिनीचा उतारा काढून मला स्वतः जामीन झाले.आज कुणीही हयात नाहीत पण त्यांनी केलेली मदत विसरलो नाही.
विलासआण्णानी मला नेहमीच आपल्या परिवारातील सदस्याप्रमाणे प्रेम दिले, जिव्हाळा दिला आणि वेळोवेळी आधार दिला.दहावी झाल्यानंतर एके दिवशी त्यांच्या शेतात काम करत होतो आणि तेव्हा विलास आण्णा आले आणि म्हटले तू का काम करत आहेस तेव्हा माझ्याकडे उत्तर देण्यासाठी शब्द नव्हते.जसा आमचा संज्या तसा तू पुढं शिक म्हटले आणि काय होतास तू आणि काय झालास तू एवढं म्हटले आणि निघून गेले. त्यांनी एक प्रकारची माझ्या मनात ठिणगी पेटवली मला जाणीव करून दिली.आणि आज जो काही मी आहे ते या लोकांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि आशिर्वादामुळे. त्यांच्या प्रेमात कधीही औपचारिकता नव्हती.त्यांचे मार्गदर्शन,आपुलकीने विचारपूस करणे आणि माझ्या अडचणी समजून घेणे या गोष्टी माझ्यासाठी नेहमीच मोलाच्या होत्या. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेतली,माझ्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आणि अनेक प्रसंगी मला मानसिक बळ दिले. माझ्या आयुष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीतील त्यांचे योगदान मी कधीही विसरू शकणार नाही.त्यांचे सामाजिक, सहकार आणि राजकीय कार्यही तितकेच उल्लेखनीय होते.
माझ्यासाठी मात्र त्यांची ओळख केवळ राजकीय आणि सहकार क्षेत्रात एवढीच नव्हती. ते माझे गुरु होते, मार्गदर्शक होते. माझ्या आयुष्यातील एक भक्कम आधार होते. त्यांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि प्रोत्साहन ही माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे.
आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून मनात असंख्य आठवणींचा कल्लोळ सुरू आहे. काय लिहावे, कसे लिहावे आणि आपल्या भावना शब्दांत कशा व्यक्त कराव्यात, हेच समजत नाही. काही माणसांचे जाणे ही केवळ व्यक्तीची उणीव नसते, तर आपल्या आयुष्यातील एका आधारस्तंभाचा अंत असतो. विलासआण्णाचे जाणे माझ्यासाठी असेच आहे.विलासआण्णा तुम्ही मला दिलेले प्रेम हे सहकार्य नव्हते, तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या माणसाला दिलेला जिव्हाळा होता. तुमचे मार्गदर्शन, तुमचा विश्वास आणि तुमची माया मी आयुष्यभर जपून ठेवेन.
आज तुम्ही प्रत्यक्षात आमच्यात नसाल, पण माझ्या आठवणींत आणि माझ्या प्रत्येक सामाजिक वाटचालीत तुम्ही कायम जिवंत राहाल. माणूस किती मोठा होता यापेक्षा त्याने किती माणसे जोडली, किती जणांना आधार दिला आणि किती हृदयांत आपले स्थान निर्माण केले, हे अधिक महत्त्वाचे असते.
तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. आज शब्द संपले आहेत, भावना अनावर झाल्या आहेत आणि मन केवळ तुमच्या आठवणींमध्ये हरवून गेले आहे.आदरणीय विलास आण्णा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.. ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो आणि आपल्या कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
ॐ शांती
शोकाकुल डॉ.सुभाष सामंत आणि सामंत परिवार कोते
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0