ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी श्री दत्त साखर कारखान्याचा ठोस कृती आराखडा
शिरोळ : प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 'पिकाची लागवड, जोपासना व व्यवस्थापनादरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत' कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व विचार विनिमय कार्यक्रम घेण्यात आला. पीक उत्पादन संरक्षण विभाग व्ही.एस.आय. पुण्याचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख डॉ. ए. डी. कडलग हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शास्त्रज्ञांना एक ठोस कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन करून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी आवर्षण परिस्थितीमध्ये ऊस पिकाचे उत्पादन टिकवण्यासाठी करावयाच्या उपायोजना, खताचा अपुरा पुरवठा व वाढत्या किमती यावर उपाय व उत्पादन खर्च कमी करण्यासाठीच्या सूचना, प्रचलित उपाय योजनेत बदल करून उत्पादन खर्च कमी व उत्पादन जास्त यासाठीची चर्चा, एकरी ऊस संख्या व वजन टिकवण्यासाठी उपाययोजना, बदलत्या हवामानानुसार रोग किडीचे प्रमाण वाढत आहे त्यावर कोणत्या वेळी कोणती खत मात्रा द्यावी जेणेकरून रोगराई कमी येईल, दूषित पाण्याचे ऊस पिकावर परिणाम व उपाय, जिवाणू खतांचा वापर कधी व किती प्रमाण याचे मार्गदर्शन व होणारे फायदे, रिकव्हरी वाढीसाठी एकूणच सर्व उपाय व चर्चा, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास उत्पादन टिकवण्यासाठीचे मार्गदर्शन अशा विविध विषयांवर सखोल व विस्तृत चर्चा करण्यात आली.
पाण्याची उपलब्धता कमी असतानाही एकरी उत्पादन कसे टिकवायचे, यावर विशेष भर देण्यात आला. अवर्षण परिस्थितीत उसाची वाढ खुंटू नये, एकरी ऊस संख्या आणि कांड्यांचे वजन टिकून राहावे, यासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा झाली. पारंपरिक खत व्यवस्थापनात आवश्यक ते बदल करून खर्च कमी करताना उत्पादन वाढविण्याच्या उपायांवरही शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. पीक व्यवस्थापनापासून काढणीपर्यंत कोणती काळजी घ्यावी, याबाबतही शास्त्रज्ञांनी संवाद साधला.
डॉ. ए. डी. कडलग यांच्यासह कृषी विद्या विभाग व्ही.एस.आय. पुणेचे शास्त्रज्ञ, प्रमुख डॉ. अभिनंदन पाटील, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक पोतदार, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जयवंत जगताप यांनी या मार्गदर्शन सत्रात सहभाग घेऊन आपले विचार मांडले.
प्रारंभी स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक श्रीशैल हेगाण्णा यांनी केले. यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हॉईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक अनिलकुमार यादव, दरगू गावडे, संजय पाटील, ॲड. प्रमोद पाटील, शेखर पाटील, बाळासाहेब पाटील हालसवडे, महेंद्र बागे, अनंत धनवडे, विजय सूर्यवंशी, सुरेश कांबळे, भैय्यासो पाटील, ज्योतीकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांच्यासह शेती अधिकारी व ॲग्री ओव्हरसीयर उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0