राजापूर बंधाऱ्यावर सीसीटीव्ही आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करा : आमदार यड्रावकर यांच्या सूचना

Nov 15, 2026 - 14:45
 0  6
राजापूर बंधाऱ्यावर सीसीटीव्ही आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करा : आमदार यड्रावकर यांच्या सूचना

राजापूर : प्रतिनिधी

राजापूर बंधाऱ्यातील २१ बरगे चोरीला गेल्याच्या घटनेची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वायरलेस सीसीटीव्ही यंत्रणा बसवून बंधाऱ्यावर कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये आणि बरगे चोरणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

राजापूर येथील बंधाऱ्यातील २१ बरगे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. बंधाऱ्यावरील बरगे चोरीला गेल्याने पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांनी बंधाऱ्याला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.

बंधाऱ्याची सुरक्षितता लक्षात घेता येथे वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच बंधाऱ्यावर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नियमित देखरेख ठेवण्यात यावी. यामुळे भविष्यात चोरीच्या घटना रोखण्यास मदत होईल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

सध्या शिरोळ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्यातील बरग्यांच्या चोरीमुळे पाणीपुरवठा आणि पाणी व्यवस्थापनावर परिणाम होऊ नये. तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची पाटबंधारे विभागाने विशेष दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान या चोरीच्या घटनेतील संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना आमदार यड्रावकर यांनी पोलिसांना दिल्या. बंधाऱ्याची सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0