१६ वर्षांचा संघर्ष मिटला; धनगर समाजाच्या एकीबद्दल आमदार यड्रावकर यांच्याकडून सन्मान

Nov 15, 2026 - 11:10
 0  6
१६ वर्षांचा संघर्ष मिटला; धनगर समाजाच्या एकीबद्दल आमदार यड्रावकर यांच्याकडून सन्मान

जयसिंगपूर : प्रतिनिधी

शिरोळ येथील धनगर समाजातील ५२ आणि ८० गटांमध्ये गेल्या तब्बल १६ वर्षांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद अखेर सामंजस्याने मिटला. अनेक वर्षांचा दुरावा बाजूला ठेवून दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे. या ऐतिहासिक एकीचे स्वागत करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या निवासस्थानी दोन्ही गटांतील समाजबांधवांचा सत्कार करून त्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मतभेदांमुळे समाजातील सामाजिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, युवा पिढीने पुढाकार घेत ज्येष्ठ मंडळींशी संवाद साधला. परस्परांमधील मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर सर्वांच्या सामंजस्यातून १६ वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला. एकाच समाजातील बांधव पुन्हा एकत्र आल्याने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी समाजातील प्रमुखांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिरोळच्या धनगर समाजाच्या पाठीशी यड्रावकर कुटुंब नेहमीच उभे राहिले आहे. समाजाच्या प्रश्नांमध्ये आमदार यड्रावकर यांनी खंबीरपणे साथ दिली असून, यापुढेही त्यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळत राहील, अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की, धनगर समाजातील दोन्ही गटांनी १६ वर्षांचा दुरावा संपवून एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. समाजाची एकी हीच समाजाच्या प्रगतीची ताकद आहे. सर्वांनी असेच संघटित राहून तालुक्याच्या आणि समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करावे. तुमच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमात आणि सामाजिक कार्यात मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0