शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी १८ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर
घालवाड–शिरटी रस्त्यासाठी १५ कोटी ; नांदणी आणि कवठेगुलंद परिसरातील रस्त्यांचाही विकास होणार
जयसिंगपूर : प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा (CRIF) योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी एकूण १८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे तालुक्यातील रस्ते विकासाला चालना मिळणार आहे. या निधीतून घालवाड ते शिरटी, नांदणी तसेच कवठेगुलंद ते शेडशाळ या मार्गांवरील रस्त्यांची रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येणार आहे.
घालवाड ते शिरटी या रस्त्याच्या सुधारणेसाठी सर्वाधिक १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, शिरटी आणि शिरोळ या मार्गाशी संबंधित प्रजिमा १४ वरील हसूर येथील छोट्या पुलाच्या बांधकामासह रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे. या कामांतर्गत संबंधित रस्त्याच्या टप्प्यांमध्ये रुंदीकरण आणि सुधारणा केली जाणार आहे.
कुरुंदवाड–नांदणी ते राज्य मार्ग १६६ या प्रजिमा १७३ मार्गावरील रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदणी परिसरातील या मार्गाच्या संबंधित टप्प्यांमध्ये रुंदीकरणासह सुधारणा केली जाणार आहे. यामुळे या भागातील वाहतुकीला अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच राज्य मार्ग १८३ वरील नृसिंहवाडी, औरवाड, कवठेगुलंद, गणेशवाडी ते राज्य हद्दीपर्यंतच्या मार्गातील कवठेगुलंद ते शेडशाळ या टप्प्याच्या सुधारणेसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्त्याचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यात येणार आहे.
शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सातत्याने प्रयत्नशील असून, या निधीमुळे महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासाला बळ मिळणार आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0