आयुर्वेद शिक्षणातून उत्तम धन्वंतरी घडविण्याचा शरद पॅटर्नचा संकल्प : अनिल बागणे

शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रथमवर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Nov 23, 2026 - 21:09
 0  2
आयुर्वेद शिक्षणातून उत्तम धन्वंतरी घडविण्याचा शरद पॅटर्नचा संकल्प : अनिल बागणे
यड्राव येथे शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये प्रथमवर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात दिपप्रज्वलनावेळी अनिल बागणे, प्राचार्य, उपप्राचार्य, पालक, विद्यार्थी आदी.

यड्राव प्रतिनिधी 

“शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी समाजासाठी संवेदनशील, सेवाभावी आणि उत्तम ‘धन्वंतरी’ म्हणून ओळखला जावा, असे दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे. शरद पॅटर्नने गुणवत्तेचे सर्व मापदंड पूर्ण करून त्याही पुढे झेप घेतली आहे. आता आयुर्वेद शिक्षणाच्या क्षेत्रातही गुणवत्तेचा हाच वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.ते यड्राव येथील शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (बी.ए.एम.एस.) यांच्या प्रथमवर्ष सत्रारंभ व विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद कणप, उपप्राचार्य डॉ. अमित मासुले उपस्थित होते.

बागणे पुढे म्हणाले की, “शिक्षणसंस्था या केवळ ज्ञान देणारी मंदिरे न राहता संस्कारांची केंद्रे व्हावीत. ज्ञानासोबतच संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देण्याचे काम ही संस्था करेल. शिक्षणाच्या विविध क्षेत्रांतून ‘शरद पॅटर्न’ नावारूपाला आला आहे. त्याच धर्तीवर आयुर्वेद शिक्षणातही ही संस्था अग्रस्थानावर राहील. विद्यार्थ्यांनी पालकांचे कष्ट स्मरणात ठेवा. आणि व्यसनापासून अलिप्त रहावे.”

कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन व दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

प्राचार्य डॉ. प्रमोद कनप यांनी आयुर्वेदिक शिक्षणाचे शास्त्रीय, सामाजिक व व्यावहारिक महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपप्रचार्य डॉ. अमित मासुले यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकिय शिक्षण, त्याचे समाजातील महत्व याविषयी माहिती दिली. 

यावेळी विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ऋषाली झरे यांनी केले. धन्वंतरी स्तवन विद्यार्थ्यांनी केले. आभार डॉ. प्रमोदनी पाटील यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0