जयसिंगपूर पालिकेचे कंत्राटी स्वच्छता कामगार आंदोलनाच्या तयारीत
काम बंद करणार, वेतन वाढीची मागणी
जयसिंगपूर : प्रतिनिधी
अनेक वेळा मागणी करून सुद्धा दुर्लक्ष केल्याने हैरान झालेले या शहरातील स्वच्छता विभागाचे कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलनाची तयारी करीत आहेत. 30 पेक्षा अधिक कामगारांनी संयुक्त सह्यांचे निवेदन प्रशासनाला दिल्याचे समजते. नालासफाई, झाडलोट, कचरा संकलन, कचरा वाहतूक अशा प्रकारची सेवा करणारे कामगार येत्या सोमवारपासून काम बंद करणार आहेत. कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संप सुरू होणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुरू असलेल्या चर्चेतून अशी माहिती मिळते की, त्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नाही, जे वेतन मिळते ते अतिशय अपुरे असून वारंवार पगारवाढीची मागणी करून सुद्धा कंत्राटदार असो वा पालिका प्रशासन त्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. एकूणच शहरातला कचरा उठाव आणि नालेसफाई बंद झाली तर स्वच्छ आणि सुंदर शहर अभियान चा पुरस्कार मिळालेल्या या पालिकेची संपूर्ण देशभरात नाचक्की होण्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत.
वर्षभरात भुयारी गटार योजना राबवण्यासाठी अखंड शहरातील रस्त्यांची खुदाई सुरू होती. काही ठिकाणी हे काम पूर्ण होऊन रस्तेही बांधण्यात आले आहेत. सांडपाण्याचा निचरा ही या शहरातील कोल्हापूर सांगली महामार्गाच्या उत्तरेकडील भागाची मोठी समस्या आहे. त्याचबरोबर या भागातील कचरा संकलन ही सुद्धा एक प्रमुख समस्या असून या दोन्ही समस्या नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आहेत. साधारणपणे पाच वर्ष या शहराला लोकप्रतिनिधीच नव्हते. जनतेला सुद्धा प्रशासक कार्यपद्धतीची सवय लागण्यापूर्वीच या शहरात निवडणुका झाल्या. नवीन सत्ताधारी आणि विरोधक एकमेका विरोधात छुपी खलबते करीत असले तरी नेमकं काय करायचं ठरवलंय तुला समजून आले नाही. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस दर दिवशी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे लक्ष्मी रोड लगतच्या बहुतेक मिळकत धारकांच्या घरात गटारीचे पाणी शिरले. या पाण्याबरोबरच सरपटणारे विषारी प्राणी सुद्धा घरात शिरले होते. सासलेल्या पाण्याचा आणि घरात दाखल झालेल्या सापांचा गटारा करताना मिळकत धारकांच्या नाकी नऊ आले होते.
दरम्यान नियमित पावसाळ्याची प्रतीक्षा आणखी काही दिवस करावी लागणार हवामान खात्याचा अंदाज असला तरी निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता गटारीचे पाणी प्रवाहित करणे अत्यंत गरजेचे आहे हे लक्षात घेऊन सांगली कोल्हापूर महामार्ग लगतची गटारीचे पाणी वाहणारी पाईपलाईन बसवण्याचे काम गेली दोन-तीन दिवस सुरू आहे. आता अचानक येणारा पाऊस या झालेल्या कामाचा दर्जा ठरवणार आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज कचरा संकलनासाठी घंटागाडी येत असते. या घंटागाडीचे वेळापत्रक निश्चित ठरलेले नाही किंवा नागरिकांना त्याची माहिती नसल्यामुळे घंटा गाडीची वाट तरी पाहत बसावे लागते किंवा घंटागाडी चालवणाऱ्याला कचरा टाकणाऱ्यांची वाट पहावी लागते त्याचबरोबर रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्याला लक्ष्मी रोडवर साठवलेला कचरा आणून टाकला जातो. हा कचरा उठाव सुद्धा नेहमीच केला जात नाही अशी लोकांची तक्रार आहे.
दुसऱ्या बाजूला कंत्राटी कामगार त्यांना मिळणाऱ्या अल्पशा वेतनामुळे आता संपाच्या तयारीत असल्याचा बोलबाला शहरात सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0