जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व अत्याधुनिक प्रसुतीगृहाचे उद्घाटन

Jun 22, 2026 - 12:04
Jun 22, 2026 - 12:05
 0  72
जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर : प्रतिनिधी

राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने आता देशपातळीवर आदर्श निर्माण करण्याची वाटचाल सुरू केली आहे. येथे सुरू करण्यात आलेले अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि प्रसुतीगृह हे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी नवे मॉडेल ठरणार असून, तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देशातील पहिले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व अत्याधुनिक प्रसुतीगृह उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन रविवारी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, इन्फोसिसच्या ट्रस्टी प्रिती वेद, आणि मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना प्रिती वेद यांनी, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यात मानाचे स्थान मिळविले असून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व प्रसुतीगृहामुळे त्याचा दर्जा आणखी उंचावला आहे. इन्फोसिस फाऊंडेशनने या प्रकल्पासाठी सहकार्य केले असून भविष्यातही आरोग्य केंद्राच्या उन्नतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांनी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्यानंतर आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, ड्रॅगन कंपनीचे विनायक आरगे, कुर्ल्याचे तहसीलदार दिलीप रायण्णावर आणि प्रणोती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्या दिप्ती जाधव, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, विनोद घोडावत, दिनेश खाडे, डॉ. बी.एस. पाटील, डॉ. ए.एस. पाटील, डॉ. शितल पाटील, डॉ. प्रवीण जैन, डॉ. विक्रम जैन, सीमा म्हैसाळे, डॉ.अकलंक चौगुले, डॉ. निखील मगदूम, डॉ. रियाज अत्तार, नंदकुमार बलदवा, सुदर्शन कदम, रोहित कुसनाळे, अशुतोष पाटील यांच्यासह रोटरी, इनरव्हील आणि आरोग्य केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बी. टी. नाईक यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0