जीवनगौरव पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा यड्रावकर कुटुंबाकडून सत्कार

Sep 29, 2026 - 21:46
Sep 30, 2026 - 19:19
 0  36
जीवनगौरव पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा यड्रावकर कुटुंबाकडून सत्कार

इचलकरंजी : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा विद्यमान चेअरमन सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि., नवी दिल्ली यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल यड्रावकर कुटुंबीयांनी आवाडे दादा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते तसेय केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उत्तर प्रदेशचे ऊस विकास राज्यमंत्री संजयसिंग गंगवार, ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, गुजरातचे सहकार मंत्री जितूभाई वधाणी, हरियाणाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, पंजाबचे शेती व शेतकरी कल्याण मंत्री गुरमितसिंग खुदियान यांच्यासह साखर उद्योगातील पदाधिकारी, उद्योजक व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत आवाडे दादा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

आवाडे दादा यांनी उभारलेल्या जवाहर सहकारी साखर कारखान्याने पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कारखान्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सहकार, साखर उद्योग, ऊर्जा, नगरविकास, शिक्षण, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आवाडे यांनी प्रदीर्घकाळ भरीव कार्य केले आहे.

त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे सदस्य, महाराष्ट्राचे उद्योग, ऊर्जा व नगरविकास मंत्री, लोकसभा सदस्य तसेच वर्ल्ड असोसिएशन ऑफ बीट अॅण्ड केन ग्रोअर्सचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर झालेला हा गौरव सर्वांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.

सत्कार प्रसंगी माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर,उत्तम आवाडे, रवी आवाडे,आदित्य पाटील-यड्रावकर, अजय पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे-यड्रावकर, मोश्मी आवाडे, रेवती आवाडे यांच्यासह यड्रावकर-आवाडे कुटुंबीय उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0