मराठी शाळांचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज : आमदार यड्रावकर
अजितकुमार कोरे यांच्या देणगीतून देवेंद्र सावंत प्राथमिक विद्यामंदिरात बालोद्यान साकार
जयसिंगपूर : प्रतिनिधी
मराठी शाळा टिकवण्यासाठी आज विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. मराठी शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, संस्कृती आणि सामाजिक जाणीव रुजवणारे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे मराठी शाळांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आनंददायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या देवेंद्र दुधराज सावंत प्राथमिक विद्यामंदिर, जयसिंगपूर येथे स्व. इंदुबाई व स्व. बाबुराव शिवराम कोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र तथा रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, जयसिंगपूरचे अध्यक्ष अजितकुमार बाबुराव कोरे यांच्या उदार देणगीतून साकारलेल्या ‘बालोद्यान’चा उद्घाटन समारंभ शनिवारी (दि. १०) आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग अँड गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य उदय पाटील होते.
बालोद्यान उभारण्यासाठी देणगी देणारे अजितकुमार कोरे यांच्या दातृत्वाचे आमदार यड्रावकर यांनी कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळातून आनंद मिळावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने बालोद्यानासारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा चौगुले यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले. स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र झेले यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी अजितकुमार कोरे यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रोहित शहा यांनीही आपले विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगतात उदय पाटील यांनी बालोद्यानाच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी शाळेचे समन्वयक गजकुमार माणगावे, राजेंद्र झेले, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे सर्व मान्यवर सदस्य, स्कूल कमिटीचे सदस्य मुरगुंडे आऊ, दीपा शेट्टी, इंगळे मॅडम, राहुल सावंत, प्रसन्ना पाटील, रोटरीचे सुदर्शन कदम, दीपक नरगच्चे, बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे स्कूल कमिटी सदस्य सचित निटवे, राजकुमार पाटील, बलदवा इंग्लिश स्कूलचे राजकुमार बलदवा बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व कर्मचारी, घोडावत कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी, झेले आय.टी.आय.चे प्राचार्य व कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्का पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे आभार रोहिणी आगरे यांनी मानले. शिशुविहारमधील चि. देवांश विनायक भोसले या चिमुकल्याने म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0