संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अस्कर अली यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कार

Sep 23, 2026 - 08:56
 0  3
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अस्कर अली यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी

   अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे (डे-बोर्डिंग) प्राचार्य श्री. अस्कर अली यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक नेतृत्वाची आणि शाळा परिवर्तनातील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन नवी दिल्ली येथे सामर्थ्य टीचर्स ट्रेनिंग अकॅडमी ऑफ रिसर्च (STTAR) यांच्यावतीने आयोजित चौथ्या वैश्विक शैक्षणिक कॉन्फरन्स व अॅवार्ड कार्यक्रमात त्यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर नाविन्यता व परिवर्तनशील स्कूल- महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता अॅवार्ड २०२६ या अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     हा भव्य सोहळा १२ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील सेठ आनंदराम जयपुरिया स्कूल, वसुंधरा, गाझियाबाद येथे संपन्न झाला. देशभरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासक आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षकांची या परिषदेला उपस्थिती होती.

    या सोहळ्याला पद्मश्री प्रा. दिनेश सिंह, कुलगुरू के.आर मंगलम विद्यापीठ व माजी कुलगुरू दिल्ली विद्यापीठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सामर्थ्य टीचर्स ट्रेनिंग अकॅडमी ऑफ रिसर्चच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुषमा रतुरी, सेठ आनंदराम जयपुरिया ग्रुपचे चेअरमन श्री. शिशिर जैपुरिया, गुगल एज्युकेशन फॉर इंडीयाचे प्रमुख श्री. संजय जैन, कार्यकारी अधिकारी व सचिव डॉ. जोसेफ इमॅन्युएल तसेच प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व 175 पुस्तकांचे लेखक डॉ. आर. एस. अग्रवाल यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

       प्राचार्य अस्कर अली यांनी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, नवोपक्रमाला प्राधान्य देणे तसेच शाळेला भविष्यातील शिक्षणाच्या गरजांशी सुसंगत बनविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची या पुरस्काराद्वारे दखल घेण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि भविष्याभिमुख शिक्षणव्यवस्था विकसित करण्यावर भर दिला आहे. या त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळेच राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. 

    या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य श्री. अस्कर अली यांचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉ.एच. एम नवीन यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0