महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कवठेगुलंद येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण

Jul 26, 2026 - 09:00
 0  5
महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कवठेगुलंद : प्रतिनिधी

गावागावातील नागरिकांना शासकीय सेवांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ग्रामीण भागात सुसज्ज शासकीय कार्यालयांची उभारणी आवश्यक आहे. तलाठी कार्यालय हे महसूल प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असून, या कार्यालयामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने होतील, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

कवठेगुलंद येथील नागरिकांच्या सोयीसाठी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन सुसज्ज तलाठी कार्यालय इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

नवीन कार्यालयामुळे परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांना सातबारा, फेरफार, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्रासह विविध महसूलविषयक कामांसाठी सुसज्ज आणि कायमस्वरूपी कार्यालय उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून, शासकीय सेवा अधिक गतिमान आणि प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यावेळी आमदार डॉ. यड्रावकर यांनी कार्यालयाची पाहणी करून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच संगिता शिंदे, आनंदा कुम्मे, श्रीकांत जगताप, विनोद जगताप, बाबासो पाटील, आदिनाथ आरबाळे, वसंत कुम्मे, राजेंद्र डवरी, मलाप्पा चौगुले, अविनाश कदम, मोहसीन वाळवेकर, सर्कल आरगे, गुरुपाद केटकाळे, तलाठी कुरने मॅडम यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0