कर्मवीर मल्टीस्टेटच्या ठेवी ८०४ कोटींवर : सभासदांना १५ टक्के लाभांश
व्याज वसुलीतून ११ कोटी ७० लाखांचा नफा
जयसिंगपूर : प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ.भिर्डी नाट्यगृह, जयसिंगपूर कॉलेज येथे उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात झाली. संस्थेने अहवाल वर्षात प्रत्यक्ष व्याज वसुलीतून ११ कोटी ७० लाख रुपयांचा चोख नफा मिळविला असून, सभासदांच्या भागभांडवलावर १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष तथा चेअरमन रमेश पाटील यांनी केली.अहवाल वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये १२२ कोटी रुपयांची वाढ झाली असून, एकूण ठेवी ८०४ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. संस्थेने ५२८ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून,स्वनिधी १०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संस्थेचा भांडवल पर्याप्तता दर १६.४९ टक्के असून, सभासदांच्या सहकार्यामुळे नेट एनपीए सलग यंदाही शून्य टक्के राखण्यात यश आले आहे.सोन्याचे वाढते दर आणि शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणुकीकडे वाढलेला कल असतानाही सभासद व ग्राहकांच्या भक्कम पाठबळामुळे संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले. संस्थेने IMPS सुविधेसह अद्ययावत मोबाईल बँकिंग ॲप सुरू केले असून,त्याचा लाभ सभासदांना होत आहे.
विविध पुरस्कारांनी संस्थेचा गौरव संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत कॉसमॉस बँक व ग्रीन वर्ल्डचा ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ पुरस्कार तसेच सहकार भारतीचा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार मिळाल्याची माहिती सभेत देण्यात आली.
संस्थेच्या वीराचार्य आधार योजना, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजना, कर्मवीर ज्येष्ठाधार योजना व धर्मादाय निधीतून अहवाल वर्षात सभासदांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकीतून सांगवडे येथे वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे.चिपरी,तिळवणी व आळते येथे शुद्ध पेयजल युनिट सुरू करण्यात आले असून, भविष्यात आणखी शाखांमध्ये अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.सभेचे उद्घाटन व्हा. चेअरमन अमोल पाटील यांच्या स्वागताने झाले. प्रमुख पाहुणे भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे नवनिर्वाचित संचालक नकुलभाऊ कडू यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कर्मवीर मल्टीस्टेटच्या प्रगतीचा आदर्श अन्य सहकारी संस्थांनी घ्यावा, असे कडू यांनी सांगितले.
सभेतील विविध विषयांवरील ठराव संचालक मंडळाच्या सदस्यांनी मांडले. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संचालक सागर चौगुले यांनी समर्पक उत्तरे दिली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी संचालिका उज्वला मगदूम,उर्मिला उपाध्ये,सर्व शाखा सल्लागार,वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील,कार्यवाह अजित भंडे, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0