श्री दत्त उद्योग समूहाचे विविध उपक्रम शेतकरी हिताची आणि राज्यातील साखर उद्योगासाठी मार्गदर्शक : साखर आयुक्त डॉ. संजय कोलते

Jul 28, 2026 - 10:22
 0  3
श्री दत्त उद्योग समूहाचे विविध उपक्रम शेतकरी हिताची आणि राज्यातील साखर उद्योगासाठी मार्गदर्शक : साखर आयुक्त डॉ. संजय कोलते
श्री दत्त उद्योग समूहाचे विविध उपक्रम शेतकरी हिताची आणि राज्यातील साखर उद्योगासाठी मार्गदर्शक : साखर आयुक्त डॉ. संजय कोलते

शिरोळ : प्रतिनिधी 

राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सपत्नीक श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व दत्त उद्योग समूहास भेट देऊन विविध प्रकल्पांची व उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ऊस विकास योजना, पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचे विशेष कौतुक केले.

भेटीची सुरुवात श्रीवर्धन बायोटेक येथे झाली. तिथे त्यांनी थेट ऊस शेतीची पाहणी करून सुपर केन नर्सरीची पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या ऊस रोपवाटिकेची माहिती घेत त्यांनी स्वतः ऊस लागवडही केली. आंबा लागवड, हळद ग्रीन हाउस ची पाहणी करून ऊस शेतीचे सखोल माहिती घेतली. यामध्ये एकरी १५० टन ऊस उत्पादकतेबद्दल सविस्तर माहिती घेवून मार्गदर्शन केले.

त्यानंतर त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळाला भेट देऊन साखर निर्मिती प्रक्रिया, मिल, कोजनरेशन प्रकल्प, दवाखाना, कॉलेज तसेच इतर विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. कारखान्याची कार्यपद्धती, स्वच्छता, तांत्रिक प्रगती आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांबाबत जाणून घेवून त्यांनी समाधान व्यक्त करत गौरवोद्गार काढले.

यानंतर त्यांनी शिरोळ येथील क्षारपडमुक्त प्रकल्पाची पाहणी करून या अभिनव उपक्रमाने त्यांची विशेष लक्ष वेधून घेतली. हा प्रकल्प राज्याला दिशादर्शक असून राज्यभर राबवला जावा असा आशावाद व्यक्त केला.त्यानंतर शेडशाळ येथे देशी बीज बँकेस भेट देऊन देशी वाणांच्या बियाण्यांचे संवर्धन, जतन आणि प्रसार ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांना अधिक बळ देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भेटीच्या पुढील टप्प्यात आलास येथील आलमखान पठाण पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन तेथे सुरू असलेल्या सामूहिक पद्धतीने राबिवल्या जात असलेल्या ठिबक सिंचन योजनेची माहिती घेतली. पाणी बचत आणि कार्यक्षम सिंचनासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर)कोल्हापूरच्या उज्वला पळसकर, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, सर्व संचालक,कार्यकारी संचालक संजीव देसाई, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0