संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ.सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

Jul 22, 2026 - 18:24
Jul 22, 2026 - 18:26
 0  97
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ.सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक
फोटो: संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी डॉ. सचिन सचिन कांबळे यांचा सत्कार करताना सोबत विभाग प्रमुख व प्राध्यापक
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ.सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

कोल्हापूर : प्रतिनिधी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

व्हिएतनाममधील टॉन डक थँग विद्यापीठ, हो ची मिन्ह सिटी येथे दि. १२ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित प्रगत पदार्थ व शाश्वत विकास विषयक आंतरराष्ट्रीय परिषद (आयकॅमएसडी–२०२६) मध्ये तोंडी संशोधन सादरीकरण विभागात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याची दखल घेत हा सन्मान टॉन डक थँग विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. कांबळे यांनी झिंक ऑक्साईड आणि मँगनीज ऑक्साईड यांच्या संमिश्राचा वापर करून ऊर्जा साठवणुकीसाठी अत्याधुनिक अतिजलद विद्युतभार साठवणूक यंत्र (सुपर कॅपेसिटर) विकसित करण्याचे संशोधन सादर केले. ऊर्जा साठवणूक, अक्षय ऊर्जा आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कार्यक्षमतेसाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता या संशोधनात आहे.

डॉ. सचिन कांबळे यांचे हे यश केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या संशोधनपरंपरेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान आहे. तसेच विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या यशातून निश्चितच मिळणार आहे.

या संशोधन कार्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटकचे डॉ. शेषनाथ भोसले, डॉ. कपिल राजहंस, डॉ. राजू मगदूम, डॉ. देवानंद कांबळे आणि इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

डॉ. सचिन कांबळे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ही अभिमानाची आणि गौरवास्पद बाब मानली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0